भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ९१ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून चणेरे गावातील 'न्यू इंग्लिश स्कूल, चणेरे' येथे किताबवारी ग्रंथालय सुरू करण्यात आले. सदर ग्रंथालयाचे उद्घाटन मा. श्री कनोजे सर यांच्या हस्ते झाले. किताबवारी संस्थेकडून या ग्रंथालयासाठी सुमारे 200 ते 230 पुस्तके देण्यात आली. ग्रंथालयाचे वैशिष्ट्य हे आहे की याचा फायदा हायस्कूलमधील 550 विद्यार्थ्यांना तर होईलच पण त्याबरोबरच गावातील आबालवृद्धांना हे ग्रंथालय खुलं आहे. या स्तुत्य उपक्रमाला हातभार लावण्यासाठी गावातील दानशूर व्यक्तींनी यशाशक्ती आर्थिक मदत देऊ केली.
ग्रंथालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी आवर्जून उपस्थित राहिलेले ह. भ.प. श्री नितीन महाराज मांडवकर यांनी या संस्थेचे 'विद्यार्थी दशेतील अवांतर वाचनाचे महत्व' विशद केले व 'किताबवारी' चे आभार मानले. ते त्यांच्या मनोगतात म्हणाले की, 'किताब' हा शब्द शैक्षणिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे तर 'वारी' हा एक परमार्थिक शब्द आहे व या दोहोंपासून निर्माण झालेला शब्द 'किताबवारी' माणसाला नक्कीच समृद्ध करेल.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. रामचंद्रजी सकपाळ (नाना) यांनी या ग्रंथालयाची पाहणी करताना 'आपली पुढची पिढी नक्कीच देशाच्या विकासात बहुमोलाचे योगदान देईल' असा आशावाद व्यक्त करीत या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. ग्रंथालयाचे उद्घाटक मा. विस्ताराधिकारी श्री. कनोजे सर यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या वाचनविषयक विचारांवर प्रकाश टाकला व समविचारी व सुसंघटित तरुणाईकडून लोककल्याणकारी कामे नक्कीच घडू शकतात, असा विश्वास व्यक्त केला.
को ए सो महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते श्री व सौ. मनस्वी महेंद्र पाटेकर या उभयतांनी उपस्थिती दर्शवली. सरतेशेवटी कार्यक्रमाचे यजमान म्हणजेच न्यू इंग्लिश स्कूल, चणेरे चे मुख्याध्यापक श्री जोंधळे सर यांनी या ग्रंथालयाचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थी व ग्रामस्थांना कसा होईल, या दृष्टिकोनातून कार्य करण्याचेही आश्वासन दिले.